top of page
Search

किल्ले रायगड: एक विशाल अनुभूती

  • Writer: Reminiscing History
    Reminiscing History
  • Aug 22
  • 4 min read

~ हर्षदा गाडेकर


आपण सगळे पहिल्यांदा जो इतिहास शिकलो आणि जो आपण आपल्या हृदयामध्ये कायमचा साठवून ठेवला तो म्हणजे चौथीच्या पुस्तकाने शिकवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. 

रायगड....हेच ते पवित्र ठिकाण जिथे संपूर्ण जग एक युगप्रवर्तक घटनेचे साक्षीदार राहिला, ती म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा.‌ मराठी मनाचा मानबिंदू, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक अशा या रायगडावर तेजसूर्य शिवरायांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.‌ रायगड सखोलपणे माझ्या वाचनात याआधी कधीच आला नव्हता. पण रायगड प्रत्यक्ष बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर जणू रायगडानेच मला आपलंसं केलं. शिवाजी महाराजांकडे बघण्याचा, त्यांना अभ्यासण्याचा माझा दृष्टिकोन आणखी व्यापक झाला. त्यानंतर काही दिवसांनी योगायोगाने मी घरी "हंबीरराव" हा चित्रपट पाहिला‌ आणि तेव्हा अक्षरशः एक लख्ख तेजाची झळाळी अंगात संचारल्याप्रमाणे मला रायगड भासू लागला. त्या चित्रपटात पाहिलेला रायगड, शिवाजी महाराजांचा वावर आणि एकूणच घडलेला इतिहास बघून असं वाटलं की हाच तो रायगड जिथे मी काही दिवसांपूर्वी जाऊन आली आहे. ही विलक्षण अनुभूती शब्दात वर्णन करता येणं कठीणच.

रायगडाचे प्रवेशद्वारच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची‌ नांदी घालून देतात. ज्ञानाचे प्रतीक असलेले कमळ‌, धन-धान्य समृद्धीचे प्रतीक असलेले ज्वारीचं कणीस‌ व सिंह आणि वाघ मिळून असलेल्या काल्पनिक प्राण्याच्या पायाखालील हत्ती हे शौर्याचे प्रतीक‌ खूप काही सांगून जाते.


PC- Parnavi Bangar and Harshada Gadekar

महाराजांच्या कल्पनेप्रमाणे, वास्तुशास्त्राचा आधार घेऊन हिरोजी इंदुलकर यांनी चहुबाजूने बळकट अशा रायगडाचे स्थापत्य रचले. पूर्वेस नगारखाना, आत विशाल प्रकट दरबार सभागृह,त्यातच भिंतीलगत निरनिराळ्या खात्यातील लेखनिक बसण्यासाठी सचिवालय, न्यायसभा विवेकसभा, तक्ख्ताची जागा, दिवाण-इ-खास, देवघर, दुय्यम प्रकारच्या संपत्तीची कोठारे, राजगृह, युवराजगृह, दफ्तरखाना, मौल्यवान संपत्तीसाठी तळघर, तीन मजली मनोरे,टांगसाळ, स्नानगृह, त्यांच्यामागे कुणबीणी निवास,शेवटी अन्नधान्याची कोठारी, मुदपाकखाना, राज्ञी निवास, युवराज निवास, बुद्धिजीवी गुन्हेगार तळघरे, सुंदर सुंदर उपवने अशी निर्मिती केली. हुजूर बाजारपेठ पाहून तर डोळे विस्फारूनच गेले. अष्टप्रधानांसाठी प्रशस्त महाल बांधले, अनेक तलाव, वाडे, मंदिरे, तोफा-बंदुकांच्या दारूची माठगृहे, पहाऱ्याच्या चौक्या, अनेक दरवाजे, सैन्याधिकाऱ्यांसाठी वाडे बांधले. या एकूणच  गरजा, त्यांचं स्वराज्यातील महत्त्व व भूमिका, यांचा अगदी बारकाईने विचार करून आत्ताच काय ते 'अर्बन/रुरल प्लॅनिंग'  शिवाजी महाराजांनी किल्ला बांधताना तेव्हापासून लागू केलं होतं.


PC- Parnavi Bangar and Harshada Gadekar

अनेकांच्या मनात एक चुकीची संकल्पना आहे की रायगडावर बारा टाक्यांचा एकच तलाव का केला नाही. याला जात धर्मभेदाची झालर तर नाही, असे प्रश्न उपस्थित होतात. परंतु याला कारण म्हणजे रात्री फिरणारे रानटी जनावर पडून एक टाके दूषित झाले तर निदान बाकीची उपयोगी यावीत किंवा एखाद्या टाक्यास चीर पडून पाणी वाहून गेले किंवा एखाद्या टाकेतील पाणी आटून गेले तर बाकीचे उपयोगी यावीत. अंघोळीच्या पाण्याचे एक टाके, कपडे धुण्याच्या पाण्याचे एक टाके, भांडी धुण्याच्या पाण्याचे एक टाके अशी बारा विधाने बारा टाक्यांविषयी संयुक्तिक करता येतील. 

हे सगळे गड नुसते गड आहेत, असे मला वाटतच नाही मूळी . ते जणू स्वराज्यपुरुषच आहेत. मावळ्यांच्या पराक्रमाची कथा सांगण्यासाठी आसुसलेले कथेकरी आहेत. धारातीर्थी पावलेल्या मावळ्यांच्या वीररसांचे आणि इच्छा आकांक्षांचे ते ढीग आहेत.‌ हिरकणी कडा मातृवात्सल्य कथेची साक्ष सांगणारी संज्ञा आहे. भूमी आणि आकाश यांतील पोकळी चिरून पुढे घुसलेली ती टकमक ची सोंड हे रायगडचे भयाण आश्चर्य व गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ होते. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण म्हणजे रायगडावरील शौचस्थानाची सोय व सांडपाण्याची व्यवस्था.

महाराजांच्या पावन समाधीस व जगदीश्वरास वंदन केले. जेव्हा जगदीश्वराच्या मंदिरासमोरचा भग्न अवस्थेतला नंदी पाहिला तेव्हा काळजात धस्स झालं, अंगावर शहारे आले आणि धर्म, संस्कृती, सत्ता, संघर्ष, राजकारण या सगळ्यांचा मेळ त्या नंदीकडे बघितल्यानंतर जाणवायला लागला.‌ जणू काही तो नंदी इतिहासच उलगडून सांगत होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी एक व्हिडिओ बघितला, त्यात कोण्या एका संस्थेने त्या नंदीला पितळेचे मुख विधिवत बसवले. ते बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि तेव्हा मला कळालं की राम जन्मभूमी, रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहेच परंतु विशेषतः उत्तर भारतीयांसाठी हा सोहळा का इतका महत्त्वाचा होता आणि त्यासाठी तिथले वयस्कर लोक का डोळ्यातून अश्रू काढत‌ होते. इतिहासाची जाण असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या घटना आणि त्यांच्याशी जोडलेल्या त्यांच्या भावना फारच महत्त्वाच्या असतात. आणि त्यानंतरच मी ‘रेमिनिसिंग हिस्ट्री’ या इंस्टाग्राम च्या पेजवर एकदा रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिरासमोरील नंदीचे डिजिटल रिक्रिएशन पाहिले आणि हा  देखील प्राचीन पुरातन वास्तू, अवशेष जे आता संपूर्ण अवस्थेत नाहीत, पण इतिहासाशी छेडछाड न करता, त्या काळात कशा असतील याची उत्सुकता,  संशोधनपूर्ण माहिती या काळात लोकांपर्यंत पोहोचवण्याचे  काम या नव्या वाटेने होत आहे हे पाहून छान वाटले.


©Parnavi Bangar, Reminiscing History

©Vrushali Jadhav
©Vrushali Jadhav

अर्धा अधिक रायगड धुंडाळून झाला होता आणि अर्धा बाकी होता. वाटेत रायगडावरील निर्गुंडी, पापट, ढवळ, रामेठा असे अनेक वृक्ष निरीक्षणात आले. आमचे काही मित्र-मैत्रिणी थकले होते ते जेवण करून आराम करू लागले आणि आम्ही काही अति उत्साही म्होरपे निघालो हिरकणी बुरुज, वाघ दरवाजा पाहण्याकरिता. अक्षरशः वाघ दरवाज्यापर्यंत पोहोचता पोहोचता आमच्या तोंडचे पाणी पळाले होते. वाघ दरवाजापाशी येऊन जेव्हा आमच्या मैत्रिणीने पराठ्यांचा डबा काढला तेव्हा आहाsss...''सुख म्हणजे नक्की काय असतं'' याची प्रचिती आली.

रायगडाविषयी कितीही लिहिलं तरी ते कमीच. एवढंच वाटतं की शिवजयंती एक दिवस साजरी करून महाराज समजणार नाही तर त्यासाठी त्यांना प्राणाहून प्रिय असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून, स्वच्छतेतून, त्यांच्या विचारांच्या जोपासणेतून हा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे जात राहिला पाहिजे. अनेक किल्ले पाहिले आणि अजूनही पाहायचेत पण रायगड हा नेहमीच माझ्यासाठी खास राहील. 

जय जिजाऊ। जय शिवराय। जय महाराष्ट्र।

©Parnavi Bangar, Reminiscing History


Nandi, Raigad Fort, Maharashtra
Buy Now

By Harshada Gadekar, B.A Economics, P.G. Diploma in Political Science

Reference books

Have a story you want to share?

Tap on the link below to tell us your stories and insights about monuments and heritage. Let's collaborate on spreading the word about our history.






 
 
 

1 Comment


rohan.benodekar
Aug 22

सुंदर लिखाण आणि उपयुक्त माहिती! सोबत असलेल्या चित्रांमुळे माहिती विस्तृतपणे समजते. फार छान!

Like
bottom of page