दुर्गदुर्गेश्वर रायगड
- Reminiscing History
- Jul 20
- 1 min read
लेखक: रोहन राजेंद्र बेनोडेकर
ते दिवस होते, जेव्हा स्वराज्याचा वटवृक्ष केवळ एक रोपटे होता तेव्हाचे. हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेऊन
शिवबाराजांनी बारा मावळ स्वतंत्र करून स्वराज्याखाली आणले होते. लगतचे जावळी खोरे मोऱ्यांकडे होते. पिढीजात 'चंद्रराव' खिताब मिरवणारे मोरे आदिलशाहीचे मांडलिक होते. स्वकीय मोरे समजुतीने जेव्हा
स्वराज्याखाली आले नाही, उलट त्यांनी उद्दामपणा केला आणि स्वराज्याच्या गुन्हेगारांना आसरा दिला, तेव्हा शिवाजीराजांनी जावळीवर हल्ला करून जावळी हस्तगत केली. या सुविख्यात युद्धानंतर मोरे
कोकणातील त्यांच्या हाताखाली असलेल्या रायरी किल्ल्यावर जाऊन बसले. शिवाजी महाराजांनी हा
किल्ला वेढला आणि जिंकला. तेव्हापासून (एप्रिल १६५६ सुमारास) रायरी स्वराज्यात आला. रायरी प्रचंड
बुलंद असा गड होता. कोकण-दख्खन देश कोठेही जाण्यासाठी रायरी एकदम हमरस्त्यावर होता. शिवाय समुद्र
जवळ. म्हणजेच रायरीची सत्ता ही अनेक घाटांची आणि वाहतुकीची सत्ता होती. एका ताशीव धोंड्यातून घडलेला
हा किल्ला अतिउंच आणि चढण्यास कठीण होता. गड अगदी सह्याद्रीच्या शिवाला कैलास शोभावा, ऐसा!

शिवाजी महाराजांच्या मनांत देखील रायरी बघताना विचार तरळला असावा,
'सिंहासनास जागा हाच गड करावा..'
शिवाजी महाराजांनी रायरीचे नाव ‘रायगड’ ठेवले.
पुढे महाराजांचा झंझावात सुरु राहिला. पन्हाळ्याला सिद्दी जौहरला शिताफीने चकमा देत महाराज परचक्रातून सुटले. शाईस्ताखानास शिकस्त देऊन
महाराजांनी मुघलांचे धाबे दणाणून सोडले. औरंगझेबाची प्रिय सोन्याची खाण असलेली सुरत लुटून तिला बदसुरत
केली. ग्र्याला बादशहा भेटीला जाऊन त्याने नजरबंद केल्यावर खुद्द बादशहाच्या हाती तुरी देऊन राजे
आपल्या देशी परतले. यगडाचे बांधकाम मात्र सुरु राहील याची दखल महाराजांनी फार पूर्वीपासून घेतली होती. बांधकाम विशेषज्ञ हिरोजी इंदुलकरांनी गडाचे बांधकाम पूर्ण केले होते. गडाच्या पूर्णत्वाचे काम नियोजनाप्रमाणे
झाले का हे बघायला महाराज रायगडी आले.
गडाच्या पायथ्याशी पाचाडला दोन चौकी आणि भक्कम तटबंदीत वसलेला वाडा होता.येथेच जिजाबाईंची पुढे बहुतांश वेळ वास्तव्य केले. त्यांची समाधी देखील या ठिकाणीच आहे. आकाशाला भिडलेला गड पाचाडहून दिसत
होता. गडाची चढण पश्चिमेकडून असल्याने बहुतांश वेळ तिथे सावली असे. हान दरवाज्यातून महाराज गड
चढत होते. अनेक दरवाज्यातून राजे वर जात असताना लहान दरवाज्यांखाली असलेला फुलांचा बहार त्यांच्या
नजरेतून सुटला नाही. काही ठिकाणी वाट सरळ खोदली होती, तर काही ठिकाणी पायऱ्या खोदल्या होत्या. कड्याच्या गर्भात धान्यकोठारे लपली होती. चढणीच्या एका बाजूने दृष्टीला भोवळ यावी असे ताशीव कडे होते
तर दुसऱ्या बाजूला नीलनभापर्यंत चढलेली दरड होती. होंमधून जाणारी चिंचोळी वाट मनाला सुखावणारी होती.
महाराज आणि सारे महादरवाज्यापर्यंत आले. महादरवाज्यापर्यंत येणारी गडाची वाट इतकी बिकट होती की इथवर यदाकदा कोणी शत्रू चढून येऊन थोपला तरीही त्याच्याकडे पुढे मात्र तलवार उचलण्याचे सुद्धा सामर्थ्य राहिले नसते. गडावर यायला ही एकमेव वाट होती.

राजे गडावर आले तेव्हा मध्यानीची वेळ असतानाही हवेत गर्व होता. प्रथम दरवाज्यातून पुढे गेल्यावर ऐरावतांना
डुंबायला हत्तीटाके बांधलेले होते. त्यानंतर गंगासागर तलाव होता. गंगासागर बालेकिल्ल्याचे प्रतिबिंब उरात
साठवून शांत होता. गंगासागरापुढे असलेल्या बालेकिल्ल्याला लागून गंगासागराच्या काठावर दोन रेखीव
खिडक्यांनी सजलेले उंच मनोरे होते. नंतर महाराजांनी सोनारशाला, दप्तरखाना, प्रधानांची जागा बघितली. उत्तरेकडील मेणदरवाजा ओलांडून महाराज मोकळ्या पठारावर आले. तिथून दूरवर पसरलेला सह्याद्री आणि
मुलुख नजरेत भरत होता.
बालेकिल्ल्याच्या मध्यभागेवर सम्राटाला शोभेल अशी भव्य राजसदर होती.सदरेवरच्या भव्य इमारतीसमोर आकाशात उंच चढलेला नगारखाना होता. नगारखाना आणि राजसदरेच्या मध्ये विस्तृत चौक होता.
पुढे महाराजांनी राजवाडा, प्रधानांचे निवास, भव्य सजलेली बाजारपेठ, पिलखाना, दारुकोठार, जगदीश्वराचे
मंदिर, अश्वशाळा साऱ्या वस्तू बघितल्या. गडाच्या एका कोपऱ्यावर टकमक टोक होते. ही कडेलोटाची जागा
होती. तिथून निजामपूरची वस्ती घरट्याएवढी दिसत होती. चांगल्या जागा बघून सरदारांसाठी, हुजुरातीसाठी, ब्राम्हणवर्गासाठी घरे उभारल्या जात होती. विपुल वस्ती, भव्य बाजारपेठ आणि प्रशस्त राजसदर याने सजलेला
रायगड 'स्वराज्याची राजधानी' म्हणून नावलौकिकास येणार होता.
रायगड सह्याद्रीच्या शिवाला शोभेल असा कैलास बनला होता. काहीच काळात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ ला याच पावन गडावर शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती जाहले. भारताच्या इतिहासाला इथूनच नवे वळण लागले, परकीय आक्रांत्यांची काळरात्र संपली आणि
रायगड महाराष्ट्राचे अनभिषिक्त तीर्थक्षेत्र बनले..
रोहन राजेंद्र बेनोडेकर यांची इतर पुस्तके:
तुम्हाला एखादी गोष्ट शेअर करायची आहे का?
स्मारके आणि वारशाबद्दल तुमचे अंतर्दृष्टी आणि कथा आम्हाला सांगण्यासाठी खालील लिंकवर टॅप करा. चला आपल्या इतिहासाचा प्रसार करण्यासाठी सहकार्य करूया.





















Comments